पिंपरी -पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाची आज विशेष महासभेत निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे या ८१ मतांनी निवडून आल्या तर उपमहापौरपदी भाजपाचे नगरसेवक तुषार हिंगे हे बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी राज्यात हालचाल सुरू असलेली महाविकास आघाडी ही महापौर निवडणुकीसाठी एकजूट असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले.

राष्ट्रवादीच्या महापौरपदाच्या उमेदवार स्वाती उर्फ माई काटे यांचा भाजपाच्या उमेदवार नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे यांनी ४० मतांनी पराभूत करत विजय मिळवला. माई काटे यांना ४१ तर माई ढोरे यांना ८१ मतं मिळाली.

राष्ट्रवादीने देखील महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर १५ मिनिटं माघार घेण्यासाठी देण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवत माई काटे यांना मतदान केलं. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडी पाहायला मिळाली.दरम्यान, महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर पीठासीन अधिकारी शंतनू गोयल यांनी उपमहापौरपदाची निवडणूक जाहीर केली.