नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या कामात भारत आणि इतर भागीदार देशांची महत्वाची भूमिका असल्याचं अमेरिकेचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी म्हटलं आहे. ते सिंगापूर इथं झालेल्या शांग्रीला संवाद सत्रात बोलत होते. मुक्त आणि खुलं भारत प्रशांत क्षेत्र ही अमेरिकेच्या सुरक्षाविषयक धोरणांच्या केंद्रस्थानी असलेली बाब आहे, या क्षेत्रातल्या विविध देशांनी अमेरिकेसोबत केलेली भागीदारी हाच शांततापूर्ण जगाचा गाभा असल्याचं ऑस्टिन म्हणाले. अमेरिका इतर देशांसोबत विशेषतः भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करत असून, भारताची वाढती लष्करी आणि तांत्रिक क्षमता या क्षेत्राला स्थैर्य मिळवून देऊ शकते असं ते म्हणाले.