नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर घातलेले निर्बंधांमागे देशातली गव्हाची वाढती मागणी पूर्ण करणं आणि त्याचवेळी शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित करणं हाच प्राथमिक हेतू होता असं कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न निर्यात प्राधिकरण अर्थात अपेडाचे अध्यक्ष एम. अंगामुथू यांनी स्पष्ट केलं आहे. एप्रिल महिन्यात गव्हाच्या निर्यातीत अचानक वाढ झाल्यानं देशातल्या गव्हाच्या किंमतींचं स्थैर्य, तसंच पुरवठ्यावरही विपरीत परिणाम झाला, आणि त्यामुळेच सरकारला निर्यात रोखण्यासारखी उपाययोजना करावी लागली असं त्यांनी सांगितलं. या परिस्थितीतही विकसनशील देशांच्या अन्न सुरक्षाविषय गरजा भागवण्याच्यादृष्टीनं भारतानं निर्यातविषयक पर्याय खुले ठेवले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अनेक देशांनी भारताकडून गहू आयात करण्याविषयी विनंती केली आहे, त्यासंबंधीच्या प्रक्रिया सरकारच्या पातळीवर केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.