नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्यांची संख्या ४ हजारच्या पुढे गेली आहे. काही वेळापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ट्वीटरवर ही माहिती दिली. या आजारानं आतापर्यंत देशात १०९ बळी घेतले असून लागण झालेल्यांची संख्या ४हजार ६७ झाली आहे. २९१ रुग्ण बरे झाले आहेत त्यातला एक देश सोडून गेला असून ६५ रुग्ण परदेशी नागरिक आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वात जास्त, ४५ रुग्ण दगावले असून त्यातल्या २१ जणांचा काल मृत्यू झाला. त्याखालोखाल गुजरात आणि मध्यप्रदेशचा क्रमांक लागतो.
राज्यातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७८१ झाली आहे. कालपासून कोरोनाची बाधा झालेले ३३ नवे रुग्ण आढळून आले. त्यात पुण्यातल्या १९, मुंबईतल्या ११, सातारा, अहमदनगर आणि वसईतल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
साताऱ्यातील एका कोरोना बाधिताचा अहवाल काल निगेटिव्ह आला असतानाही आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. ही ६३ वर्षीय परदेशातून साताऱ्यात आली होती. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना दाखल करण्यात आलं होतं. उपचार झाल्यानंतर त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
पालघर जिल्ह्यात आता पर्यंत १७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातले १५ वसई -विरार महानगरपालिका क्षेत्रातले आहेत तर दोघे पालघर तालुक्यातले आहेत. आतापर्यंत पालघरमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून १२२ जणांच्या चाचणीचे निकाल प्रलंबित आहेत.