नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेरियावर उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा इतर गरजू देशांना विशेषतः शेजारी देशांना आवश्यकतेनुसार करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

कोविड १९ची साथ देशात पसरत असताना आरोग्यसेवक, डॉक्टर्स, परिचारिका इत्यादी करता विषाणूप्रतिबंधक म्हणून या औषधाची गरज असल्यामुळं गेल्या महिन्यात त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ती उठवण्याची मागणी अनेक देशांकडून होत होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही व्यक्तिशः ही विनंती भारत सरकारला केली होती.

कोविड१९ विरुद्ध मानवजातीच्या लढाईत भारताचं योगदान या दृष्टीनं या औषधाचा पुरवठा मोजक्या प्रमाणात इतर देशांना विशेषतः शेजारी देशांना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं.