नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 मध्ये, स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर हे अभियान जनचळवळ बनले त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली गंगा नदी आणि उपनद्यांची स्वच्छता हे अभियान म्हणून हाती घेण्यात येईल, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले.
नमामी गंगे अंतर्गत दिल्लीतल्या आठ घाटांवर क्लिनेथॉन आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अविरल धारा, निर्मल धारा आणि स्वच्छ किनारा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न वास्तवात साकारण्यासाठी क्लिनेथॉन प्रकल्पाला जनचळवळीचे स्वरुप यायला हवे, असे ते म्हणाले.
स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच नद्या स्वच्छतेलाही जनचळवळीचे हळूहळू स्वरुप प्राप्त होत असल्याचे केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी सांगितले.