नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीनं, आरोग्य सेवेचं चार विभागात विभाज़न करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार सर्दी खोकल्याची लक्षणं असणाऱ्यांसाठी एक, सौम्य लक्षणं असणाऱ्यांसाठी दुसरे, तीव्र लक्षणं असणाऱ्यांसाठी तिसरं आणि कोरोनाच्या लक्षणांसह इतर दुर्धर आजार असणाऱ्यांसाठी चौथं अशा चार वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णालयांची घोषणा त्यांनी केली.
शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. केशरी शिधापत्रिका धारकांना राज्य सरकार ८ रुपये किलो दरानं प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि १२ रुपये किलो दरानं प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ देणार आहे. केंद्र सरकारची योजना फक्त अन्नसुरक्षा लाभार्थ्यांसाठीच आहे मात्र राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ इतरांनाही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिधावाटप व्यापक करण्यासाठी पंतप्रधांना विनंती केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोरोना विषाणू विरुद्धच्या युद्धात सहभागी होऊन सेवा द्यायची तयारी असलेल्या आरोग्य विभागात काम केलेल्या निवृत्ती सैनिक, परिचारिका, वार्डबॉय आणि यासंदर्भात प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांनी सरकारशी संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यासाठी ”कोवीड योद्धा ऍट द रेट जीमेल डॉट कॉम” या इमेलवर संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलं आहे.
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे, मात्र हा आकडा शून्यावर आणण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, घरी राहा, जीवनावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी मास्क वापरा असं आवाहन त्यांनी केलं.