नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध राज्यात कोरोना विषाणू संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं विशेषज्ञांचा समूह महाराष्ट्रासह इतर ८ राज्यांमध्ये पाठविला आहे. याशिवाय गोरगरिबांना मदत देता यावी म्हणून स्वयंसेवी संस्थांना थेट अन्न महामंडळाकडून धान्य खरेदीची मुभा देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

देशात सुरुवातीला पीपीई किट्सची कमतरता होती. मात्र आता पीपीई किट्स, एन ९५ मास्क, वेंटिलेटरचा पुरवठा सुरू झाला आहे. देशातल्या २० उत्पादकांना सुमारे पावणे दोन कोटी पीपीई किट्स बनविण्याचे आणि ४९ हजार वेंटिलेटरची निर्मितीचेही आदेश देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. गरजेप्रमाणे या वस्तूंचा पुरवठा करण्यात येत असल्याने पीपीई किट्स, वेंटिलेटर यावरुन कुणीही अफवा पसरवू नये किंवा घाबरू नये असे आवाहन त्यांनी केले.

केवळ अति धोका असलेल्या भागात जाण्यासाठी पीपीई किट्स आवश्यक असून मध्यम धोका असलेल्या ठिकाणी एन ९५ मास्क आणि हातमोजे पुरेसे आहेत. यासंदर्भात सर्वांना निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. एन ९५ मास्क एकदा घातल्यावर ८ तासापर्यंत वापरता येतो, त्यामुळे त्यापूर्वी तो फेकणे योग्य नसल्याचा निर्वाळा अग्रवाल यांनी दिला. हायड्रोक्झीक्लोरोक्विनचा देशात पुरेसा साठा असून भविष्यातही त्याची कमतरता निर्माण होणार नाही.

हृद्यविकार आणि हृद्याशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींना हे औषध हानीकारक ठरू शकतं, त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नये असा इशारा केंद्र सरकारनं पुन्हा एकदा दिला आहे.