नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संकटामुळे पाहता राज्यात विधानपरिषदेच्या निवडणूक होणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकार आणि इतर काही राज्यांप्रमाणे राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात वर्षभरासाठी ३० टक्के कपात करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. वर्षभरासाठी ही कपात लागू राहणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणांमांचा अभ्यास करण्यासाठी दोन समिती सरकार नेमणार आहे.
एक समिती राज्यातल्या मंत्र्यांची असणार असून दुसऱ्या समितीत अर्थतज्ज्ञ, उद्योजक, निवृत्त अधिकारी, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल. ही समिती राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी उपाय सुचवेल.
महाराष्ट्र दिनी अर्थात 1 मे रोजी राज्यभरात होणारे ध्वजारोहण साधेपणाने केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी व निवडक मान्यवरांच्या उपस्थितीतच करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. यावेळी कुठलाही कार्यक्रम किंवा परेड होणार नाही.