नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात युवकांना केंद्रस्थानी ठेवून सर्व धोरणं आखली जात आहेत. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, डिजिटल इंडिया सारख्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्या हस्ते झालं. २०२२ यावर्षासाठी देशभरातल्या २९ पुरस्कार विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

पुरस्कार मिळाल्यानंतर लोकांकडून येत असलेल्या अपेक्षांचा दबाव घेण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घ्या, असं आवाहन त्यांना या विजेत्यांना केलं. जगातल्या अनेक कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी भारतीय आहेत, याची आठवण त्यांनी या मुलांना करुन दिली. गगनयानाच्या माध्यमातून देश लवकरच अंतराळात मानव पाठवत असून यासाठी निवड झालेल्या अंतराळवीरांचं प्रशिक्षण सुरू असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातून स्थानिक भाषेतल्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं आहे. तुम्हीही स्थानिक वस्तूंना प्राधान्य द्या, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली.