नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्यात अत्यावश्यक वैद्यकीय साधनं आणि औषधं तातडीनं खरेदी करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सक्षम करणारं पॅकेज केंद्र सरकारनं मंजूर केलं आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना तसंच आरोग्य आयुक्तांना पत्र पाठवलं आहे.

संपूर्णपणे केंद्राच्या निधीवर हे पॅकेज तीन टप्प्यात मार्च २०२४ पर्यंत राबवलं जाईल, असं या पत्रात म्हटलं आहे. येत्या जूनपर्यंतच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्यांसाठी निधी खुला करत आहे. या टप्प्यात कोविड रुग्णालयं, विलगीकरण सुविधा, अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन पुरवठा इत्यादी सुविधांच्या विकासावर भर राहणार आहे