नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर , विद्यार्थ्यांचं  शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व विद्यापीठांना केली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल आणि  कुलपती कोश्यारी यांनी काल सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी विविध विषयांवर चर्चा केली.
सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाही तसंच विद्यापीठांच्या उन्हाळी परिक्षा सामायिक पध्दतीनं घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरुंना केली. व्हर्च्युअल क्लास रुम तसंच तंत्रज्ञानावर आधारित इतर ऑनलाईन सुविधांच्या मदतीनं  विद्यापीठांनी अध्यापनाचं कार्य सुरु ठेवावं असं त्यांनी सांगितलं.
राज्यातील विद्यापीठांच्या परिक्षा सामायिकपणे घेता येतील का याचा अभ्यास करुन शासनाला अहवाल सादर करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर तसंच एसएनडीटी महिला विद्यापीठांच्या कुलगुरुंची समिती गठीत केली असून समिती लवकरच अहवाल सादर करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी  राज्यपालांना दिली.