मुंबई : बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना आहे. त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्ताने उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून राज्यातील जनतेला सत्यशोधक विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यावरील कोरोनाचं संकट लक्षात घेऊन सर्वांनी आपापल्या घरात थांबूनच क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांचे, कार्याचे स्मरण करावे. जयंतीचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत व कुणीही घराबाहेर पडू नये, घरातच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच शिक्षणाची संधीही उपलब्ध केली. महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन दिली. अनेक क्षेत्रात, महिला आत्मविश्वासाने जबाबदारी सांभाळताना दिसतात त्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला आहे. या दोघांनी समाजकार्याचा डोंगर उभा केला.

अंधश्रद्धा, अस्पृश्यता, वाईट चाली-रिती, अनिष्ट रुढी-परंपरांवर कडाडून हल्ला चढवला. त्यासाठी त्रास, अपमान सहन केला. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, महिलांना, समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना हक्काची जाणीव करुन दिली व ते मिळविण्यासाठी बळ दिले. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांचे सामाजिक कार्य अलौकिक आहे. त्यांचे कार्य, विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा निर्धार आपण जयंतीच्या निमित्ताने करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांच्या कार्याचं स्मरण करुन अभिवादन केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यात काही ठिकाणी कृषी बाजार, भाजी मंडया थोड्या काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने लोकहितासाठी घेतला आहे. या अल्पकालीन निर्णयाला संबंधित शेतकरी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.