उमरेड येथील वृक्षदिंडी समारोपास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
नागपूर : वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभाग गेल्या पाच वर्षांपासून चांगले काम करत असून,हरित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्यातील जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उमरेड येथे वृक्षदिंडी कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वने राज्यमंत्री डॉ.परिणय फुके, नगराध्यक्षा श्रीमती विजयालक्ष्मी भदोरिया, खासदार कृपाल तुमाने,सर्वश्री आमदार प्रा.अनिल सोले, गिरीष व्यास, नागो गाणार, रामदास आंबटकर,सुधीर पारवे, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव हे उपस्थित होते.
राज्यात पूर्व विदर्भ हरित म्हणून ओळखला जातो. मात्र आता पूर्व विदर्भातही गेल्या काही वर्षांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून अगदी 47 अंश सेल्सीअसच्याही पुढे जात आहे. त्यामुळे आता हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. राज्य शासनाने यंदा 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, या मोहिमेत सर्वजण सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण करतील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.
यापूर्वीही राज्य शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण केले आहे. आताही ते 35 कोटी वृक्ष लागवड केल्याशिवाय थांबणार नाहीत. दरवर्षी लावलेल्या झाडांपैकी 80 टक्के झाडे वाचतात. कारण त्या झाडांचे योग्य ते संगोपन आणि संवर्धन केले जात आहे, त्यांना जिओ टॅगींगही केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वातावरणातील वाढत्या तापमानाची मोठी समस्या निर्माण होत असून, आता सर्वांनीच वृक्षारोपण करणे आवश्यक झाले आहे. पर्यावरण असंतुलनाची विविध कारणे असली तरी त्यामध्ये प्रामुख्याने वृक्षतोड ही आहे. वाढत्या प्रदूषणाचे संकट हे अतिरेकी स्वरुपाचे असून, वृक्ष लागवड करूनच, पर्यावरणपूरक विकास करताना प्रदुषणावर मात करुया, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार सुधीर पारवे यांनी अनेक विकासकामांच्या मागणीचा प्रस्ताव ठेवला आहे. ती कामे येत्या काळात पूर्ण होतील आणि उमरेड शहरात सत्र न्यायालयाची इमारत पूर्ण करण्यासाठीआवश्यक निधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी “जल है तो कल है” म्हणत, वृक्ष लावा हा वनाचा उपदेश आज राज्यातील प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचला आहे. 33 कोटी वृक्षारोपण व संवर्धन हा संकल्प पूर्ण करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे आज वृक्षारोपण करणे काळाची गरज बनली असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 1 ते 31 जुलै या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात वृक्ष लागवडीचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषीत केला. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने वृक्षारोपणाचे महत्व जाणून, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे, यासाठी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन या संस्थेकडून पूर्व विदर्भात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. त्या वृक्षदिंडीचा समारोप आज उमरेड येथे करण्यात आला.
वाढते शहरीकरण, औद्योगिकरणामुळे मानवाचा विकास होत असताना वृक्षतोड झाली. त्यामुळे पाऊस हा अनियमित आणि लहरी झाला असून, प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावण्याचे आवाहन खासदार कृपाल तुमाने यांनी केले.
प्रास्ताविक करताना आमदार अनिल सोले यांनी निसर्गाकडून प्राणवायू मिळत असून,निसर्गाची परतफेड करायची असेल तर वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करा, असे आवाहन केले. आमदार सुधीर पारवे यांनी वनविभागाच्या तीन एकर जमिनीवर 900 च्या वर वृक्षारोपण करण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी नागरिकांचा विशेष कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मुग्धा या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचनही करण्यात आले.