नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या विशाखापट्टणम नाविक दलाच्यावतीने खात्याअंतर्गत उत्पादित करण्यात आलेले ‘पोर्टेबल मल्टीफीड ऑक्सिजन मॅनफोल्ड’चे पाच संच स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी व्ही. विनय चंद, नाविक बंदराचे अधीक्षक ॲडमिरल रिअर श्रीकुमार नायर, वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत या वैद्यकीय संच सुपूर्द करण्यात आले. दि. 9 एप्रिल2020 रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्यावेळी पूर्व नाविक अधिकारी  आणि आंध्र वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. सुधाकर उपस्थित होते.

नौदलाच्या वतीने दिलेल्या या वैद्यकीय संचामध्ये एकाचवेळी सहा रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करता येतो. त्यासाठी एका मोठ्या आकाराच्या ऑक्सिजनच्या बाटलीला औद्योगिक रचनेनुसार सहा त्रिज्यात्मक मार्ग विकसित करण्यात आले आहेत. अशा प्रकारचे पाच पूर्ण संच सध्या देण्यात आले आहेत. उर्वरित 20 संच पुढील दोन आठवड्यात देण्याच्या दृष्टीने विशाखापट्टणम नाविक दल नियोजन करीत आहे.