नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड19चा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लावलेल्या लॉकडाऊन संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यसरकारांना दिले आहेत.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता ट्रक, मजूर, गोदामं आणि कोल्ड स्टोरेज यांच्या हालचालींना अडचणी येऊ नयेत यासाठी मंत्रालयानं विविध सूचना वेळोवेळी दिल्या आहेत. सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना लिहीलेल्या पत्रात म्हटलंय की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत व्हावी याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नसल्याचं आढळलं आहे.

अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक पोलीस अडवत असून यामुळे अशा वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे योग्य परवाना बाळगणारा ट्रक चालक आणि एक सहायक यांना वाहतुकीला तसंच रिकाम्या ट्रकना वाटेत माल भरायला अडवू नये, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. त्यांची घरी येण्या जाण्याची सोयही करायला सांगितलं आहे.