नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामचे पंतप्रधान महामहीम गुयेन झुआन फुक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

दोन्ही नेत्यांनी कोविड-19 महामारीमुळे उदभवलेल्या परिस्थितीबाबत आणि या आव्हानाचा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.

कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठी द्विपक्षीय सहकार्यासह आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्याच्या शक्यतेबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. त्यांनी उभय देशात सध्या राहत असलेल्या परस्परांच्या  नागरिकांबद्दल काळजी वाहण्याची कटिबद्धता व्यक्त केली.

दोन्ही नेत्यांनी भारत आणि व्हिएतनाममधील धोरणात्मक भागीदारीच्या महत्त्वावर भर दिला आणि विविध आघाड्यांवर अलिकडच्या काळात झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा देखील आढावा घेतला.

महामारीसंदर्भातील उपाययोजना आणि द्विपक्षीय संबंधांच्या अन्य पैलूंबाबत समन्वय साधण्यासाठी दोन्ही देशांची पथके आगामी काळात परस्परांच्या संपर्कात राहतील, याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली.

सध्याच्या संकटकाळात व्हिएतनामी लोकांच्या आरोग्यासाठी आणि निरामय जीवनासाठी पंतप्रधानांनी  शुभेच्छा दिल्या.