नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ ला रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातली कार्यालयं, कारखाने आणि आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या सर्व इमारतींचं प्रवेशद्वार , भोजनालय, लिफ्ट आणि प्रसाधनगृह पूर्णपणे निर्जंतुक करणं आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्या-जाण्यासाठी वाहन उपलब्ध करणं आवश्यक असून, वाहनाच्या एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ ३० ते ४० टक्के इतकेच कर्मचारी एका वेळी वाहनातून प्रवास करू शकतील. कार्यालयाच्या परिसरात प्रवेश करणारं प्रत्येक वाहन फवारा मारून निर्जंतुक करणं तसंच प्रवेश द्वारातून आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं थर्मल स्क्रिनिंग करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
सर्व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय विमा आवश्यक असून, हात धुण्यासाठी आणि सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करावी लागेल. प्रत्येक कार्यालयात कामाच्या दोन पाळ्यांमध्ये एक तासाचं अंतर ठेवणं,  सुरक्षित सामाजिक अंतराचं पालन व्हावं यासाठी जेवणाची सुट्टी वेगवेगळ्या वेळी देणं, तसंच कार्यालयाच्या परिसरात कुठल्याही कामाव्यतिरिक्त येणाऱ्यांना बंदी घालण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.  याशिवाय मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलं असून थुंकण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही मास्कचा वापर अनिवार्य आहे.