नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातले १७० जिल्हे हॉटस्पॉट म्हणून केंद्र सरकारनं जाहीर केले आहेत. मोठ्या संख्येने असलेले कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण असलेले किंवा कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांची संख्या वाढण्याचा मोठा दर असलेले किंवा रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा दर जलद असलेल्या जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटमध्ये करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. ज्याठिकाणी कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण सापडले आहेत अशा २०७ जिल्ह्यांचे वर्गीकरण नॉन हॉटस्पॉट असलेले जिल्हे म्हणून करण्यात आले आहे. याठिकाणी कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ज्या ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही अशा जिल्ह्यांचे वर्गीकरण हरित क्षेत्रात करण्यात आले आहे. त्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा रुग्ण यापुढेही आढळू नये यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे ते म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाचे जास्त रुग्ण आढळल्याने सील करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये घरोघर जाऊन सर्व लोकांची तपासणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. याठिकाणी सारी आणि इन्फ्लुएन्झा या आजाराची लक्षणं आढळलेल्या रुग्णांचीही तपासणी केली जाणार आहे.
येत्या २० एप्रिलपर्यंत देशातल्या सर्व शहरांचे, जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.