पुणे : कोव्हीड-19 पार्श्वभूमीवर देशात लॉकडॉऊन जाहीर झाल्यामुळे नियमित औषधोपचार घेणाऱ्या कॅन्सर रुग्णांना ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा रुग्णांवर नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या मार्गदर्शक सूचनांनूसार रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता अजय चंदनवाले यांनी दिली आहे.
मागील 22 दिवसात 470 रुग्णांनी कर्करोग बाह्यरुग्ण विभागामध्ये सल्ला घेतला आहे. तसेच 190 रुग्णांवर किमोथेरपी करण्यात आली आहे. कर्करोग रुग्णांकरीता बाह्यरुग्ण विभागाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे. पुणे शहराबाहेर राहणाऱ्या परंतु रुग्णालयात नियमितपणे उपचार घेणाऱ्या जुन्या रुग्णांना दूरध्वनीवरून सल्ला दिला जात आहे. तसेच ज्या रुग्णांना शक्य आहे त्यांना रुग्णांना रुग्णालयीन भेटी आणि प्रवास टाळण्यासाठी किमोथेरपी ऐवजी तोंडावाटे घ्यावयाच्या औषधांची मात्रा घेण्याचा सल्ला दिला जात आहे, असल्याची माहिती अशी माहिती बी.जे. वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता चंदनवाले व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे कर्करोगतज्ज्ञ डॉ.चकोर व्होरा यांनी दिली आहे.