पुणे : 33 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. यावर्षी या कार्यक्रमांतर्गत 1 जुलै ते 30सप्टेंबर या कालावधीत मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, या वृक्षलागवड कार्यक्रमात शेतकरी, विद्यार्थी व विविध यंत्रणांनी सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक वनीकरणविभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागीयांनी केले.

33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ सामाजिक वनीकरण विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागी यांच्या हस्ते तर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव – पश्चिम) सुनिल लिमये,  मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर,वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्या विशेष उपस्थितीत भरे (ता.मुळशी) येथे करण्यात आला. विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी वृक्षारोपणासंबंधीची प्रतिज्ञा घेतली.

या प्रसंगी बोलताना डॉ. त्यागी म्हणाले,  33 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात दरवर्षी प्रत्येकाने किमान एक वृक्षलागवड व संवर्धन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वृक्ष लागवड हे ईश्वरीय कार्य असल्याचे नमूद करुन वृक्ष लागवडीमुळे आपणास पिण्यासाठी शुद्ध पाणी व श्वसनासाठी ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्याचे तसेच प्रदूषण, वाढणारे तापमान, वातावरणातील बदल या समस्यांची सोडवणूकही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येकाने किमान एक रोप लावण्याबरोबरच किमान 10 रोपे वाचवून वृक्ष संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण करावे असे लिमये यांनी सांगितले. या प्रसंगी वंदना मारणे, मुक्ता मारणे, सुमन मारणे, नंदा टेमघरे, सुनिता डफळ या ग्रामस्थांना वन विभागातर्फे गॅसचे वाटप करण्यात आले.

या वर्षी 33 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत पुणे जिल्हयास 1 कोटी52 लक्ष 36 हजार एवढे वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट आहे. यावेळी उपवनसंरक्षक रमेश कुमार, उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी, उपविभागीय अधिकारी सुधीर जोशी, दिलीप घोलप, अभय चव्हाण,डॉ.स्मिता पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या प्रसंगी ग्रामस्थ, विद्यार्थी, विविध खात्यांचे अधिकारी, पदाधिकारी तसेच वन खात्याचे अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.