सातारा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात कापूस खरेदी केंद्रामध्ये कापूस खरेदी सोमवार दि. 20 एप्रिलपासून सुरु करण्यात येत असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुक्यात कापूस पिकवला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस सध्या त्यांच्या घरांमध्ये आहे. तो खरेदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये असणाऱ्या सूचनांचे पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार होणार असल्याचेही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे अर्थकारण या कापूस उद्योगावर अवलंबून आहे. कापसाचे उत्पन्न चांगल्या प्रकारचे झालेले आहे. चांगल्या प्रतीचा कापूस उत्पादन झाला आहे. शेती पूरक उद्योगांना मुभा देण्याची केंद्र व राज्य शासनाची भूमिका आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश या विभागातील जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या असून कोरोना व लॉकडाऊन काळातील सूचनांचे पालन करून कापूस खरेदी करण्यात यावी. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी केंद्रावर आणावा. कापूस खरेदी केंद्र व कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी संयुक्तिक नियोजन करावे. जे शेतकरी ऑनलाईन व फोनद्वारे बुकिंग करतात त्या शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत कापूस केंद्रावर आणावा हे त्यांना कळवले जाणार आहे. कापसाची प्रत तपासून त्याचे वजन करून कापूस खरेदी केली जाईल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील कापसासह घरामध्ये सुरक्षितता म्हणून साठवून ठेवलेला कापूसही खरेदी केला पाहिजे अशी शासनाची भूमिका असल्याची माहितीही सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.