डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून व्यक्त केला आनंद
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरा होऊन घरी परतला आहे. वसमत तालुक्यातील एक व्यक्ती जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण म्हणून निदर्शनास आला होता. सदर रुग्णाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून या रुग्णावर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरु होते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे 14 दिवसानंतर व 15 दिवसानंतर दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने तब्बल 17 दिवसानंतर या रुग्णाला आज डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारात बरा झाल्याने रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर तर आनंद होताच, परंतु त्याच्यावर यशस्वी उपचार करुन त्यास बरे करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे कोरोना आयसोलेशन वार्डात काम करणारे डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी यांचा आनंदही द्विगुणित झाला होता. त्यामुळे या सर्वांनी टाळ्यांच्या गजरात बाधित रुग्ण बरा झाल्याचा आनंद व्यक्त करत त्यास डिस्चार्ज पेपर देऊन, रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णाला घरी सोडले.
बाधित रुग्ण 17 दिवसात बरा
49 वर्षीय कोरोना बाधित रुग्णास दि. 31 मार्च, 2020 रोजी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. हा रुग्ण कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्यास जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे दाखल करुन त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममार्फत आयसोलेशन वॉर्डमध्ये औषधोपचार सुरु होते. या रुग्णांचा थ्रोट स्वॅब औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सदर थ्रोट स्वॅब अहवाल ‘पॉझिटिव्ह’आला होता.
हा व्यक्ती जिल्ह्यातील पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने जिल्ह्यात भीतीची वातावरण निर्माण झाले होते. तपासणी अहवालानंतर आयसोलेशन वॉर्डात दाखल करुन त्याच्यावर उपचार करण्यात आले. या कालावधीत जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात आढळून येणाऱ्या संशयित रुग्णांवर उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तीचा 14 दिवसानंतरचा तसेच 15 दिवसानंतर असे दोन्ही स्वॅब घेऊन तपासणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आला होता. 14 एप्रिल रोजी रोजी 14 दिवसानंतर आणि 15 एप्रिल रोजी 15 दिवसानंतरचा हे दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी ठरले देवदूत
कोरोना संसर्ग वार्डात पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन शिप्टमध्ये डॉक्टर, पारिचारिका यांची टीम अहारोत्र कार्यरत होती. जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, भिषक डॉ. नारायण भालेराव, डॉ. गिरी, अधिपरीचारीका श्रीमती ज्योती पवार, आयसोलेशन वार्डातील सर्व अधीपरिचारिका, शिपाई, सुरक्षारक्षक यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी हे या रुग्णांसाठी देवदूत ठरलेत.
डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्या सेवेमुळेच झाला पुर्नजन्म…
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर मी प्रचंड घाबरलो होतो. माझे कुटुंबही प्रचंड तणावात होते. मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांच्यामार्फत माझ्यावर चांगल्या पद्धतीने उपचार झाले, अगदी कुटूंबातील सदस्य समजूनच येथील कर्मचाऱ्यांनी माझ्यावर उपचार केल्याने मी 17 दिवसात बरा झालो. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी त्यांच्यामुळेच मला पुनर्जन्म मिळाला, मी खूप आनंदी असून त्यांचे ऋण जीवनात कधी फेडू शकणार नाही. तसेच या आजाराला कोणीही घाबरुन जाऊ नये, कारण याची बाधा झाली तर हा आजार पूर्णत: बरा होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया संबंधित रुग्णाने कोरोना संसर्ग वॉर्डातून घरी जाताना व्यक्त केली.