कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पुण्याहून आलेला पहिला कोरोना रूग्ण आणि त्याच्या संसर्गात आलेली त्याची बहिण अशा दोघांचेही दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने ते कोरोना मुक्त झाले होते. अशा दोघांना आज येथील अथायू रूग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि तुळशीचे रोप देवून घरी सोडण्यात आले.

येथील भक्तीपूजानगरमध्ये पुण्याहून आलेल्या तरूणाला 26 मार्च रोजी कोरोना झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या बहिणीचाही कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आला होता. या दोघांनाही सरनोबतवाडी येथील अथायू रूग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अथायू रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश पुराणिक, नर्सिंगच्या अधीक्षक शीतल राणे, उप व्यवस्थापक राहूल खोत, कॅज्युलिटी इनचार्ज विजय महापुरे हे या दोघांवर उपचार करत होते.

आवश्यक ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे, काही पूरक जीवनसत्वे, जोडीला समुपदेशन आणि आयुर्वेदिकतेचीही पध्दती या 23 दिवसांत उपचारात वापरण्यात आल्याची माहिती डॉ. पुराणिक यांनी दिली. मुख्य रूग्णालयापासून बाजूला असणाऱ्या इमारतीत कोव्हिड -19 चा विलगीकरण कक्ष करण्यात आलेला होता. यामध्ये जीवनरक्षक यंत्रणेसह सर्व आपत्कालीन सुविधा तैनात ठेवण्यात आली होती.

14 दिवसानंतर या दोघांचेही दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले होते. आज कोव्हिड-19 या विलगीकरण कक्षापासून दोन्ही बाजूला रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दोन्ही बाजूला फुगे लावण्यात आले होते. रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात या दोघांना निरोप दिला. रूग्णालयाच्या लॉबीत असणाऱ्या श्री गणेशाची त्या दोघांनी आरती करून दर्शन घेतले. रूग्णालयाच्या प्रवेशव्दारावर फुगे फोडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दोघांनाही तुळशीचे रोप आणि मिठाई देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, रूग्णालयाचे अध्यक्ष अनंत सरनाईक उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाकडून अथायू रूग्णालयाचे आभार-डॉ. कलशेट्टी

जिल्ह्यामध्ये सापडलेल्या पहिल्या कोरोनाबाधित आणि त्यांच्यामुळे संसर्ग झालेल्या अशा दोन्ही रूग्णांवर अथायू रूग्णालयाने गेल्या 23 दिवसांत अतिशय चांगल्या पध्दतीने उपचार केले. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांच्या बरोबरीने अथायू रूग्णालयाने कोरोना विरूध्दच्या या लढाईत सहभाग घेतला, असे सांगून महापालिका आयुक्त्‍ डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या रूग्णालयाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार मानले.