मुंबई : मोटार वाहन नियमानुसार वाहन चालविणाऱ्या वाहनधारकाकडे संबंधित वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती असणे आवश्यक आहे. मुंबई, कल्याण,नाशिक, नागपूर व चंद्रपूर या शहरातील महाविद्यालयात 49 शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरे आयोजित करण्यात आली. यामध्ये एकूण 1782 अर्जदारांनी शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज केले. त्यापैकी 1217 अर्जदार संगणकीय चाचणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना शिकाऊ परवाने देण्यात आले, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.
अशी अनुज्ञप्ती प्राप्त करुन घेण्यापूर्वी वाहनधारकास संगणकीय चाचणीद्वारे शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करुन घेणे क्रमप्राप्त आहे. अशा शिकाऊ अनुज्ञप्तीकरिता महाविद्यायांतील विद्यार्थ्यांना परिवहन कार्यालयात येऊन संगणकीय चाचणीची प्रक्रिया पार पाडावी लागत होती. अशा प्रक्रियेकरिता महाविद्यालयांतील विद्यार्थ्याचा बहुमोल वेळ खर्ची पडतो.
वरील वस्तुस्थितीचा सामाजिक विचार करुन वाहन चालविण्याची शिकाऊ अनुज्ञप्ती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्याकरिता महाविद्यालयात संगणकीय चाचणी घेऊन अनुज्ञप्ती देण्याचा माहे जानेवारी 2017 मध्ये परिवहन विभागाद्वारे निर्णय घेण्यात आलेला आहे.
वरील निर्णयानुसार महाविद्यालयांद्वारे शिकाऊ अनुज्ञप्तीची संगणकीय चाचणी घेण्याबाबत सर्व परिवहन कार्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व विद्यापीठांना महाविद्यालयामध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरे आयोजित करण्याबाबत विनंती करण्यात आली.
या योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता परिवहन कार्यालयांचा नियमित आढावा घेण्यात येतो.
सर्व लोकप्रतिनिधींना याद्वारे आवाहन करण्यात येते की, आपआपल्या मतदारसंघात ही योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही श्री. रावते यांनी निवेदनाद्वारे सांगितले.