नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत राज्यात उद्यापासून काही प्रमाणात व्यवहार सुरू होणार. मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. तसेच नागरिकांनीही अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडावं, बाहेर पडताना नेहमी मास्क घालावा आणि सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणं दिसली तर लगेच तापाच्या दवाखान्यात जावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
हृदयरोग, किडनी, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रुग्णालयं सुरू करायची तयारी डॉक्टरांनी दाखविली आहे. सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांनी मात्र सरकारी रुग्णालयातच यावं असंही ते म्हणाले.
संचारबंदीत अडकलेल्या इतर राज्यातील तसेच राज्यातील कामगारांनी, मजुरांनी आहे तिथेच राहावे, राज्य सरकार त्यांची पुर्ण काळजी घेईल असा विश्वास देतांना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी यासंदर्भात बोलणी सुरु असल्याचे सांगितले. यावर लवकरच मार्ग निघेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी सुखरुप पाठवू असा शब्द ही त्यांनी यावेळी दिला.
जिल्ह्यांच्या सीमा अजूनही उघडलेल्या नाहीत, कोरोना विषाणू संसर्ग नसलेल्या जिल्ह्यातले नागरिक जिल्ह्यातल्या जिल्ह्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ३ मे पर्यंत रेल्वे, विमानसेवा सुरू होणार नाही हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दराने राज्य सरकार अन्नधान्य वितरित करते आहे. केंद्र सरकार मोफत वाटपासाठी तांदूळ आला आहे. गहू आणि डाळींची मागणी केंद्राकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सरकारने उद्यापासून काही अटींवर केशरी आणि हरित झोनमधल्या जिल्ह्यात उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली आहे. आतापर्यंत शेतीविषयक कामे, शेतमालाची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच होती. परंतु या क्षेत्राले जे उद्योजक कामगारांची काळजी घेतील, त्यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करतील त्यांना उद्यापासून काम सुरू करण्यासाठी मुभा देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी १८००-१२०-८२-००-५० या क्रमांकावर किंवा १८००-१०-२४०-४० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती त्यांनी केली.