अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची माहिती
मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (एपीएल) रेशन कार्डधारक नागरिकांना राज्य शासनाकडून तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे प्रति व्यक्ती पाच किलो अन्न धान्य रेशन दुकानांमधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील रेशन दुकानांमध्ये या अन्न धान्याचे वाटप १ मे ऐवजी आता २४ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. धान्य वाटप करताना प्रत्येक दुकानाच्या ठिकाणी लॉकडाऊनचे नियम व सामाजिक अंतर राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आदी योजनामधून अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो. नियंत्रक, शिधा वाटप यांच्या कार्यालयाच्या मुंबई व ठाणे क्षेत्रात होणाऱ्या अन्नधान्य पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा डॉ. कदम यांनी घेतला. यावेळी त्यांनी अन्नधान्य वाटप सुरळीत होण्याच्या दृष्टीने प्रशासनास योग्य त्या सूचना दिल्या.
मुंबई महानगर प्रदेशातील ५७ लाख केशरी शिधापत्रिकाधारकांना फायदा
लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्यातील नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी शिधावाटप दुकानांमधून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (एपीएल) कार्डधारक नागरिकांना अन्नधान्य देण्यात येत नव्हते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहून लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्यातील नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी ५९ हजार ते १ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना १२ रुपये प्रति किलोने दोन किलो तांदूळ व ८ रुपये किलोने तीन किलो गहू प्रति व्यक्ति देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेचा मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे ५७ लाख २० हजार लाभार्थींना लाभ होणार आहे. या धान्याचे वाटप यापूर्वी १ मे रोजी सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, आता येत्या २४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत महानगर प्रदेशातील नागरिकांना रेशन दुकानांमधून हे धान्य वाटप होणार आहे. त्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून रेशन दुकानदारांना धान्य वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. कदम यांनी दिली.
तसेच अंत्योदय योजनेतील पिवळे रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंबांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून मोफत तांदूळ वाटप सुरू करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील रेशन दुकानांमधून एप्रिल महिन्यात २७ हजार ७८४ मेट्रिक टन तांदळाचे १२ लाख ०५ हजार ४२५ शिधापत्रिकाधारकांना मोफत वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १० हजार ५९३ मे.टन तांदळाचे वाटप लवकरात लवकर करण्याचे निर्देश डॉ. कदम यांनी यावेळी दिले.
तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांसाठी तसेच अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांसाठीच्या एप्रिल महिन्यातील अन्नधान्याची शंभर टक्के उचल करण्यात आली आहे. या दोन्ही योजनेतून एप्रिल महिन्यात १३ हजार ८३७ मेट्रिक टन तांदूळ व २० हजार १५५ मेट्रिक टन गव्हाचे १६ लाख ९५ हजार १५९ शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यात आले आहे.
अन्नधान्य वाटपातील गैरप्रकारांविरुद्ध कडक कारवाई
गरीब व गरजू रेशनकार्ड धारकांना अन्नधान्याचे नियमित व व्यवस्थित वाटप न करणाऱ्या व धान्य वाटपात गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री डॉ. कदम यांनी यावेळी दिले.
शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य मिळण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी व तक्रारीकरीता मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात एकूण ५२ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सदर नियंत्रण कक्षात येणाऱ्या तक्रारींवर त्वरीत कारवाई करण्यात येते.
अन्नधान्य वितरणातील गैरप्रकार रोखण्यासाठी शिधा वाटप नियंत्रक कार्यालयाअंतर्गत मुंबई व ठाणे क्षेत्रात ४४ पथके नेमली आहेत. या पथकाद्वारे आतापर्यंत अन्नधान्याचे वितरण व्यवस्थित न करणाऱ्या ७ दुकानांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील १ दुकान कायमस्वरुपी रद्द तर एक दुकान निलंबित करण्यात आले असल्याची माहिती नियंत्रक शिधा वाटप यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सहकार्याने २१ ठिकाणी धाडी टाकून अनधिकृतपणे साठविलेले ४१ लाख २४ हजार ९७६ मास्क व १८ हजार ७३३ हँड सॅनिटायझर जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किमत १९ कोटी २५ लाख ६३ हजार ८१० रुपये इतकी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या बैठकीस शिधा वाटप नियंत्रक कैलास पगारे, उपनियंत्रक श्री. लिलाधर दुफारे व श्री. ज्ञानेश्वर जवंजाळ आदी उपस्थित होते.