नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोरोना विषाणू संसर्गामुळे ५० जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ३८३ नवे रुग्ण आढळले. देशातली कोरोनाबाधितांची संख्या आता १९ हजार ९८४ झाली आहे. आतापर्यंत या आजाराने एकूण ६४० जण मरण पावले आहेत तर ३ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत.
आयसीएमआर, अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आतापर्यंत देशभरात चार लाख ६२ हजार ६२१ संशयितांच्या घशातल्या स्रावाची तपासणी केली असून, काल दिवसभरात २६ हजार ८४३ नमुन्यांची तपासणी झाली. देशभरात आतापर्यंत २१७ सरकारी तर ८७ खासगी प्रयोगशाळांना कोरोना विषाणू संसर्ग चाचण्या करण्याची परवानगी दिली आहे.
राष्ट्रपती भवन सचिवालयातला कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रपती भवनानं दिलं आहे. दिल्लीतल्या बी. एल. कपूर रुग्णालयात एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळं मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कात राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातली व्यक्ती आली होती.
ही व्यक्ती आणि तिच्या कुटुंबियांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर मृताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं मात्र त्याच्या कुटुंबातल्या इतरांना या विषाणूची बाधा झालेली नाही. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून ते राहत असलेल्या परिसरातल्या ११५ कुटुंबांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.