नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीएचएफएल घोटाळ्यातील वाधवान कुटुंबियांच्या अलगीकरणाचा कालावधी आज संपणार आहे. त्यानंतर त्यांना ताब्यात घ्यावं यासाठी ईडी आणि सीबीआयला पत्र पाठविल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या फार मोठ्या चुकीमुळे या मंडळींना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी मिळाली. तरी राज्य सरकार वाधवान कुटुंबाला पाठीशी घालत नसल्याचं स्पष्टीकरणही गृहमंत्री देशमुख यांनी दिलं आहे.

पालघर इथं जमावाकडून तीन जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविल्याचेही ते म्हणाले. हत्याकांडानंतर आठ तासात तब्बल १०१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अनेकजण जंगलात पळाले होते. त्यांनाही शोधून काढण्यात आल्याचं गृहमंत्री देशमुख यांनी सांगितलं. पालघर हत्याकांडाच्या आडून विरोधकांकडून जातीय राजकारणाचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला.