नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारच्या सूचनांचं पालन केलं तर आपण कोविड १९ च्या संकटावर मात करु शकू असं दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी म्हटलं आहे. रमज़ानचा पवित्र महिना लवकरच सुरु होत असून घरी राहूनच प्रार्थना करावी असं आवाहन त्यांनी आज व्हीडीओद्वारे मुस्लिम समाजाला केलं. यादरम्यान तराबी नमाज़ अदा करताना तीन ते चार जणांपेक्षा जास्त गर्दी करु नये. असं आवाहन त्यांनी केलं आहे.

फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मुकर्रम अहमद यांनी सांगितलं आहे की विलगीकरणात असणाऱ्यांना रोजा पाळता येत नसल्यास त्यांनी फक्त प्रार्थना करावी, रोजे नंतर ठेवता येतील. इफ्तारच्या वेळेला आवश्यक अन्नपदार्थांची खरेदी करता यावी याकरता मुस्लीम बहुल भागात प्रशासनाने निर्बंध शिथिल करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
इमामांनी रमजानच्या काळात मशिदींच्या भोंग्यांवरुन कोविड19 प्रतिबंधासाठीच्या मार्गदर्शक सूचनांची  माहिती द्यावी असं दिल्ली वक्फ बोर्डाने सांगितलं आहे.