कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणींसंदर्भात आढावा बैठक

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रांना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये येत असलेल्या काही अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने खरेदी केंद्र आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.

आज मंत्रालयात कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदी केंद्रांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कापूस खरेदी करावी. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर कापूस घेवून जात असताना काही अडचणी असल्यास स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत शासन संवेदनशील असून शेतकऱ्यांनी काळजी करु नये असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

बैठकीला पणन विभागाचे अपरमुख्य सचिव अनुप कुमार, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यावस्थापकीय संचालक नवीन सोना, पणन विभागाचे उपसचिव का.गो. वळवी उपस्थित होते.