‘कोरोना वॉरियर्स’ चे मनोबल उंचावण्यासाठी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून उपक्रम

अमरावती :  तणावाचे निरसन होण्यासह सकारात्मक ऊर्जेच्या संचाराची अनुभूती कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी अहोरात्र झटणाऱ्या कोरोना वारियर्स यांना आज मिळाली. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री  ॲड. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून कोविड रुग्णालयात सेवा दिलेले व सध्या क्वारंटाइन असलेल्या डॉक्टर आणि पोलिसांसाठी ध्यान धारणा प्रशिक्षण येथील डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनीत आज सकाळी आयोजित करण्यात आले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वतः या सर्वांसह ध्यानधारणेत सहभाग घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम हेही यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षक शिवाजी कुचे यांनी यावेळी सकारात्मक विचार, साक्षीभावाचे महत्त्व व ध्यानसंगीत प्रात्यक्षिकातून ध्यानधारणेची अनुभूती सर्वांना दिली. डॉक्टर व पोलीस यांच्यासह सर्वच या प्रात्यक्षिकात मनापासून सहभागी झाले होते.

ध्यान करताना साधली जाणारी एकाग्रता,  अनुभवाला येणारी निरामय शांतता व ताण तणावाचे निरसन यातून आमचे मनोबल उंचावले. कोविड रूग्णालयात सेवा दिल्यानंतर आम्ही सध्या क्वारंटाइन आहोत. या प्रशिक्षणाने मनोबल उंचावण्यासाठी मदत झाली. आम्ही पुन्हा सेवेसाठी नव्या दमाने सज्ज होत आहोत, असे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.

सध्या डॉक्टर, पोलीस व इतर यंत्रणा कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी अहोरात्र व जीवाची पर्वा न करता राबत आहेत. या काळात त्यांचे मनोबल टिकून राहणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी हे मेडिटेशन प्रशिक्षण आरोग्य अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांच्यासाठी नियमितपणे राबवले जाईल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

सहायक प्राध्यापक पंकज शिरभाते, व्यवस्थापक अमोल कोंडे आदी उपस्थित होते.