आधार फाउंडेशनचे मदतकार्य कौतुकास्पद – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती : सध्याच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मेळघाटातील आदिवासी बांधवांना आधार फाऊंडेशनतर्फे किराणा व जीवनावश्यक साहित्याचे वाटप होत आहे. या संकट काळात हे मदतकार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
आधार फाऊंडेशनतर्फे मेळघाटातील 300 आदिवासी कुटुंबांना किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनासमोर पालकमंत्र्यांच्या हस्ते नारळ वाढवून मदतकार्याचा श्रीगणेशा करण्यात आला.
आधारच्या या कार्याला शुभेच्छा देत पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. ते रोखण्यासाठी संचारबंदी लागू असताना सर्वसामान्य नागरिकाला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही नियमित व्हावा, यासाठी विविध निर्णयांची अंमलबजावणी होत आहे. स्वयंसेवी संस्थांचेही त्यासाठी सहाय्य मिळत आहे. आधार फाऊंडेशननेही आदिवासी बांधवांसाठी मदतकार्य उभारण्याचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीची झळ सर्वसाधारण आदिवासी कुटुंबाना बसू नये या हेतूने आधार फाऊंडेशनतर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दात्यांनी जवळपास 2 लाख 70 हजार रूपयांचे मदत साहित्य, तसेच आर्थिक स्वरूपात केली आहे. फाऊंडेशनतर्फे मेळघाटातील रबांग, खिडकी, कासमात या आदिवासी गावातील सुमारे तीनशे कुटुंबांना वाटप करण्यात येत आहे, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांनी यावेळी सांगितले.