नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळपासून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले ४२१ नवे रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात १११ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहेत. देशात आतापर्यंत एकूण २६ हजार ९१७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २० हजार १७७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशातले एकूण ५ हजार ९१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ८२६ जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यानंतर गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांचा क्रमांक लागतो.
राज्यात काल आणखी 811 कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा ७ हजार ६२८ झाला आहे. या आजारानं आतापर्यंत 323 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातले 22 जण काल दगावले. काल दिवसभरात 119 जण या आजारातून बरे होऊन घरी परतले असून, राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या एक हजार 76 झाली आहे.
मुंबईत गेल्या 24 तासांत कोविड19च्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 281 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5 हजार 49 झाली आहे. त्यापैकी 191 जणांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात 167 कोरोना रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत मुंबईतले 762 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती महानगर पालिकेने दिली.
मुंबईत धारावी इथले  ३५० खासगी दवाखाने येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे. या ठिकाणी कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांवर उपचार केले जातील तसंच कोरोना संशयितांची प्राथमिक  चाचणी केली जाईल.
कोरोना विषाणू संसर्गामुळं मुंबईतल्या दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. वाकोला पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत एक ५७ वर्षीय हेड़ कॉन्स्टेबल आणि संरक्षण शाखेत कार्यरत एक ५२ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळं मृत्यू झाला. मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिसांनी या शूर योद्धांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या राज्यातल्या २० पोलिस अधिकारी आणि ८७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी, तीन अधिकारी आणि चार कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून, अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असल्याचं राज्य शासनानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलं आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज कोविड १९ चे १२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कल्यााण-डोंबिवलीतल्या एकूण रुग्णांची संख्या १२९ झाली आहे. सर्वाधिक ७९ रुग्ण डोंबिवलीत आढळले असून त्यानंतर कल्याणचा क्रमांक लागतो. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यु झाला तर ४० जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे.
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत विषाणु संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. यात आज एकुण ३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी केली असुन तिन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
अहमदनगरच्या जामखेड इथं कोरोना रुग्णाच्या संख्येत आज आणखी ३ व्यक्तींची भर पडली. जिल्हा रुग्णालयानं पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन पुरुष तर एक महिला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे तर जिल्ह्यातील बाधीतांची संख्या ४३ झाली आहे.
धुळे शहरातल्या आज आणखी तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १५ झाली आहे.
यवतमाळमध्ये आज आणखी १६ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं सध्या जिल्ह्यात ५० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
जालना जिल्हा रुग्णालातल्या विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या दोन्ही कोरोना बाधित महिलांचे सलग दोन  कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आल्यामुळे जालना जिल्हा सद्यस्थितीत कोरोनामुक्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली. नकारात्मक अहवाल आलेल्या शहरातल्या दु:खीनगर भागातल्या महिलेला अन्य आजारही असल्यानं प्रकृती काहीशी गंभीर असून, परतूर तालुक्यातल्या शिरोडा ३९ वर्षीय महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं डॉ. राठोड यांनी सांगितलं.