नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९च्या उपचारांसाठीच्या प्लाझ्मा थेरपी बद्दल लोकांना असलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकारने जाहीर केली आहेत. या उपचार पद्धतीत कोविड१९ मुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तातून वेगळ्या केलेल्या अॅंटीबॉडीज कोरोना बाधितांना त्याची परवानगी असेल तरच दिल्या जातात. कोरोना संसर्गामुळे  गंभीर आजारी असलेल्यांसाठी  ही पद्धत वापरली जाते.

अमेरिका, इंग्लंड आणि चीन मध्ये कोविड१९ च्या उपचारासाठी ही पद्धत प्रायोगिक तत्वावर वापरली जात आहे. भारतात औषध नियंत्रण मंडळानं प्लाझ्मा थेरपीला परवानगी दिली आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं दिलेल्या निर्देशांचं पालन करून इच्छुक संस्था ही उपचार पद्धती अमलात आणू शकतात. यापूर्वी एबोला विषाणू संक्रमणात ही पद्धत फायदेशीर ठरली होती.