नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात covid-19 मधून बऱ्या होणाऱ्या  रूग्णांचं  प्रमाण 22 पूर्णांक 17 दशांश टक्के झालंअसल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. जिथे पूर्वी कोरोना रुग्णांची नोंद झाली होती अशा देशातल्या सोळा जिल्ह्यात गेल्या 28 दिवसात एकाही नव्या रूग्णाची नोंद झाली नाही. यामध्ये महाराष्ट्रातल्या गोंदिया, कर्नाटकातला देवंगरे, बिहारमधल्या लाखी सराई या जिल्ह्यांचा नव्यानं समावेश झाला आहे. देशातल्या 85 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसात कोरोनाचा नवा रुग्ण आढळला नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

ही लढाई covid-19 विरुद्ध असून कोविडग्रस्तांविरुद्ध नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावं असे आवाहन अग्रवाल यांनी केले. या संक्रमणातून बरे झालेले लोक आपल्या अँटीबॉडीज देऊन इतरांना बरं करू शकतात असे ते म्हणाले. या आजाराबद्दल चुकीची माहिती कोणीही पसरवू नये तसंच पोलिस आणि सफाई कर्मचार्यांतना सहकार्य करावं असं आवाहन  अग्रवाल यांनी जनतेला केले.

देशभरात कालपर्यंत 80% गव्हाची कापणी झालेली असून 80% बाजार समित्या कार्यरत झाल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी दिली. 60 टक्के अन्न प्रक्रिया उद्योगांनी काम करणं सुरू केले आहे तर मनरेगाअंतर्गत मजुरांना आणि स्थलांतरित मजुरांना रोजगार उपलब्ध होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.