नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी सुमारे २३ टक्के रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. मात्र अजूनही या आजारावर ठोस उपचार सापडला नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
जगभरात अनेक ठिकाणी तसंच देशातही प्लाझ्मा थेरपीचा वापर सुरू झाला आहे. मात्र हा वापर अजूनही प्रायोगिक तत्त्वावर असून संशोधन सुरू आहे. कोविड १९ वर उपचार करण्यासाठी याचा वापर करता येईल असे कुठलेही पुरावे नसल्याचं सहसचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं दिलेल्या दिशानिर्देशांनुसार प्लाझ्मा थेरपीचे प्रयोग केले नाहीत, तर विपरीत परिणामही होऊ शकतात असा इशाराही त्यांनी दिला.
त्यामुळे नागरिकांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणं, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडणं यासारखी खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या १७ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसात एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही, असंही ते म्हणाले.