उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई  : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला आहे. सतत आनंदी, उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं. त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला. ‘कपूर’ कुटुंबाचा कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. काल इरफान खान यांचं निधन झाल्यानंतर आज ऋषी कपूर यांच्या निधनाची आलेली बातमी, हे खरोखरंच धक्कादायक, वेदना देणारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, ऋषी कपूर हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी  होते, परंतु त्या वेदना त्यांनी रसिकांना जाणवू दिल्या नाहीत. जीवनाच्या अखेरपर्यंत चित्रपटसृष्टीशी आणि रसिकांशी नातं, संपर्क कायम राखलेले ते कलावंत होते. भारतीय चित्रपट जगताच्या इतिहासात त्याचं नाव, त्यांचा अभिनय अजरामर राहील, मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्यांच्या निधनाचं दु:ख सहन करण्याचं बळ कपूर कुटुंबियांना मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.