पुणे : राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता वेगवेगळया उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्हयात पाऊस मोठया प्रमाणात झाल्यास पुरस्थिती निर्माण होऊ शकते, अशा वेळी आजुबाजुच्या बांधकामांना धोकादायक ठरु शकतील अशा अर्धवट स्थितीतील बांधकामे, ज्योत्याची व बेसमेंटची बांधकामे इत्यादींना मर्यादित स्वरुपात बांधकाम परवानगी देणेबाबत आदेश निर्गमित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले.

जोत्यासाठी व बेसमेंटसाठी केलेली खोदकामे अशा ठिकाणी पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही व त्यामुळे जीवितास धोकादायक स्थिती उद्भवू शकते. उपरोक्त पार्श्वभुमीवर पुणे जिल्हयातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत, छावणी परिषद पुणे, खडकी देहूरोड व या कार्यालयाने जाहिर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये संबधित आस्थापनांनी अतिबाधित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रामध्ये प्रकरणनिहाय परवानगी देणेबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.

अर्धवट स्थितीतील जोत्यांचे बांधकाम, बेसमेंटचे बांधकाम, संरक्षक भिंत बांधकाम इत्यादी भुस्खलन प्रतिबंधक बांधकामे, आजुबाजूच्या इमारती, रस्ते यांना पाणी साचुन धोकादायक ठरु शकतील अथवा डासांची निर्मिती वाढेल अशी अर्धवट स्थितीतील बेसमेंटच्या भरावांची कामे. लॉकडाऊन आदेश अंमलात येण्यापूर्वी प्रत्यक्षात सुरु झालेली आजमितीला अत्यावश्यक असलेली जलरोधक कामे, लॉकडाऊन आदेश अंमलात येण्यापुर्वी प्रत्यक्षात सुरु झालेली आजमितीला अत्यावश्यक असलेली जलरोधक कामे. राहत्या इमारतीमधील आजमितीला अत्यावश्यक असलेली आधीपासून सुरु झालेली परंतु अपुर्ण अवस्थेतील प्लास्टर, प्लंबींग इत्यादी स्वरुपाची दुरुस्तीची कामांचा यामध्ये समावेश आहे.

या कामांसाठी आवश्यक असलेली माल वाहतुक 17 एप्रिल 2020 रोजीच्या मार्गदर्शक सूचनानुसार तरतुदींना अधीन राहून करता येईल. त्यासाठी वाहतुक परवाना व्यवस्था व तसेच बांधकामांसाठी आवश्यक कर्मचारी, यंत्रचालक, मजुर यांना एकवेळ कामाच्या ठिकाणी आणण्यासाठी वाहतुक परवाना देण्याची व्यवस्था महानगरपालिका आयुक्त यांनी परवाना देण्यासाठी प्राधिकृत केलेले स्वाक्षरीकर्ता, नगरपरिषदेसाठी मुख्याधिकारी यांनी करावी. सदरचे कामगार हे महानगर पालिका ,नगरपरिषद ,नगरपालिका, नगरपंचायत, छावणी परिषद पुणे, खडकी देहुरोड व या कार्यालयाने त्यांचे क्षेत्रात जाहिर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रामधून कामासाठी येणार नाहीत, याची दक्षता स्वाक्षरीकर्ता यांनी घ्यावी, असे आदेशात नमूद आहे.

बांधकामावरील पर्यवेक्षण करणारे कर्मचारी, विविध यंत्रचालक व मजुर यांना येण्यासाठी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर करता येणार नाही या सर्वांसाठी राहण्याची व्यवस्था बांधकामांच्या ठिकाणी करण्यात यावी. सदर कामकाजाच्या ठिकाणी 17 एप्रिल 2020 रोजीचे शासन आदेशातील निर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. बांधकामाच्या जागेस बॅरिकेंडींग करुन घेण्यात यावे. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी “सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक व तातडीचे मान्सुन पुर्व बांधकाम” असा ठळक स्वरुपातील फलक दर्शनीय ठिकाणी लावण्यात यावा असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.

कामगारांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था काम चालू असलेल्या परिसरातच करावी लागेल. बांधकाम ठिकाणी दिवसभरात येणा-या प्रत्येक कामगारांचे थर्मल स्कॅनिंग करणे बंधनकारक करावे. आठवडयातून दोन वेळा सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. तसेच ज्यांची शारिरिक क्षमता चांगली असेल त्यांनाच काम करणेची मुभा देण्यावी यावी. आजारी कामगारांसाठी स्वतंत्र विलिगिकरण कक्षाची व्यवस्था तयार ठेवावी. बांधकामाच्या जागेवर गर्दी टाळावी. तसेच सोशल डिस्टिंसिंगचे काटेकोर पालन करावे. दोन व्यक्तींमधील कमीत कमी अंतर एक मीटर ठेवावे. सर्वांना हस्तांदोलन टाळण्याच्या सुचना देण्यात याव्यात. कामगारांनी चेह-यावर स्वच्छ धुतलेला कपडा अथवा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील तसेच गरजेनुसार हातमोजे व ॲपरन परिधान करावा. हातमोजे खिशात घालण्याचे टाळावे. हाताने चेहरा, डोळे, तोंड, नाक यास स्पर्श करु नये. बांधकामावर कार्यरत असणा-या मजुरांनी व इतर कर्मचारी यांनी एकमकांचे मोबाईल फोन, रुमाल, पाणी बॉटल, ग्लास इत्यादी बाबी वापरु नये अथवा हाताळु नये.

भ्रमणध्वनीचा वापर करताना शक्यतो स्पीकर फोनचा वापर करावा. भ्रमणध्वनीचा स्पर्श शक्यतो चेह-याला टाळावा. कामाच्या ठिकाणी ज्या वस्तूंना वारंवार हाताने स्पर्श होण्याचा संभव आहे, अशा बाबी उदा. प्रवेशद्वार, सर्व दरवाज्याचे हॅन्डेल, पाण्याचे नळ, स्वच्छतागृह, अवजारे तसेच तात्पुरत्या स्वरुपात तयार केलेल्या निवारागृह ठराविक कालावधीनंतर 10 टक्के प्रमाणात सोडियम हॉयपोक्लोराईट असलेल्या निर्जंतुकीकरण द्रावणाने स्वच्छ करावेत. कामगार, कर्मचारी यांना जेवणापूर्वी अथवा काम संपल्यानंतर तसेच आवश्यक तेव्हा हात धुण्यासाठी साबण, हँडवॉश, पाणी व कामादरम्यान निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. दैंनंदिन काम संपल्यानंतर लगेच साबण व स्वच्छ पाण्याने आंघोळ करण्याच्या सूचना सर्वांना द्याव्यात.

बाहेरील व्यक्तींचा प्रवेश टाळण्यासाठी बॅरिकेडची व्यवस्था करावी लागेल. बांधकाम करण्यासाठी देण्यात आलेली परवानगीची प्रत व कामगारांच्या प्रवासाच्या परवानगीची प्रत स्थानीक पोलीस स्टेशनकडे संबंधित बांधकामकर्ता यांनी जमा कराव्यात, या अनुषंगाने अर्ज करणे व बांधकाम परवानगी देणे यासाठी महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, छावणीपरिषद पुणे, खडकी, देहूरोड यांनी आपल्या पातळीवर विहीत कार्यपध्दती तयार करावी व त्यास प्रसिध्दी द्यावी. व या सूचनांची सर्व संबंधितांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी केल्या आहेत.