नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात टाळेबंदीचा कालावधी आणखी दोन आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केलेत.

कोरोना विषाणू बाधित रूग्णांच्या संख्येनुसार देशातल्या सर्व जिल्ह्यांची ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन मध्ये विभागणी केली असून, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे नियम शिथिल केले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय तिन्ही झोनमधल्या जिल्हयांची यादी दर आठवड्याला नव्यानं तयार करुन राज्य सरकारांना देईल. त्यात रेड आणि ऑरेंज झोनमधे आणखी जिल्ह्यांचा समावेश करण्याची मुभा राज्य सरकारांना राहील. मात्र रेड झोन मधला जिल्हा ऑरेंज झोनमधे किंवा ऑरेंज झोनमधला जिल्हा ग्रीन झोनमधे बदलता येणार नाही.

कंटेनमेंट झोन किंवा प्रतिबंधित क्षेत्रातल्या सर्व नागरिकांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावं लागणार आहे, तसंच या भागातल्या नागरिकांना वैद्यकीय गरज वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी दुसऱ्या भागात ये-जा करता येणार नाही.

देशभरात झोनचा विचार न करता विमान, रेल्वे, मेट्रो आणि आंतरराज्य वाहतूक बंदच राहणार आहे, शाळा, महाविद्यालयं, इतर शैक्षणिक प्रशिक्षण संस्था बंद राहतील मात्र ऑनलाईन शिक्षण चालू ठेवता येईल. हॉटेल्स, रेस्टॉरंट, चित्रपट गृह, मॉल्स, व्यायाम शाळा, क्रीडा संकुल, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसंच इतर मेळाव्यांवर बंदी कायम राहणार आहे, सर्व धर्मिक स्थळंही बंदच राहतील. रेड झोनमध्ये मॉल्स वगळता जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र केश कर्तनालय आणि स्पा बंदच राहतील. टॅक्सी, रिक्षा, सायकल रिक्षा बंद राहतील.