इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका आणि विषय सूची लवकरच जाहीर करण्यात येईल – रमेश पोखरीयाल ‘निशांक’
नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशांक’ यांनी आज नवी दिल्ली येथे इयत्ता 9 वी आणि 10 वी च्या माध्यमिक टप्प्यासाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका प्रसिद्ध केली.
याप्रसंगी मंत्री म्हणाले की, ही दिनदर्शिका शिक्षकांना मनोरंजक, सुरस पद्धतीने शिक्षण प्रदान करणाऱ्या विविध तांत्रिक आणि सोशल मिडिया संधानांच्या वापरासंबधी मार्गदर्शक सूचना प्रदान करेल, ज्याचा उपयोग विद्यार्थी, पालक आणि शिक्षक घरी असताना देखील करू शकतील. तथापि, मोबाईल, रेडीओ, दूरचित्रवाणी, एसएमएस आणि विविध समाज माध्यमांमध्ये प्रवेश करण्याच्या विविध स्तरांचा विचार करण्यात आला आहे.
पोखरीयाल पुढे म्हणाले की, आपल्या बऱ्याच जणांच्या मोबाईल मध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नसते किंवा ते व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर, गूगल इत्यादी सोशल मीडियाच्या विविध साधनांचा वापर करू शकत नाहीत ही वास्तविकता लक्षात घेत शिक्षकांना पालक आणि विद्यार्थ्यांना मोबाईल फोनवर एसएमएस किंवा व्हॉईस कॉलद्वारे कशाप्रकारे मार्गदर्शन करता येईल याबाबत दिनदर्शिकेत मार्गदर्शन करण्यात आले आहे. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना ही दिनदर्शिका लागू करण्यासाठी पालक मदत करतील अशी अपेक्षा आहे.
इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका आणि विषय सूची लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती मंत्र्यांनी दिली. या दिनदर्शिकेत दिव्यांग मुलांसह (विशेष गरज असणारी मुले) सर्व मुलांच्या गरजांची पूर्तता केली जाईल असे ते म्हणाले. श्राव्य पुस्तके, रेडीओ कार्यक्रम आणि दृकश्राव्य कार्यक्रमांच्या लिंकचा येथे समावेश केला जाईल.
दिनदर्शिकेत अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकातून घेतलेला विषय/धड्यावर आधारित रोचक आणि आव्हानात्मक कामांच्या आठवड्यांच्या योजनांचा समवेश आहे ही बाब यावेळी पोखरीयाल यांनी अधोरेखित केली. सर्वात म्हत्वाचे म्हणजे यात अभ्यासाच्या परिणामांसह विषयांची आखणी करण्यात आली आहे. शिक्षक / पालकांना पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन मुलांच्या शिकण्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करणे सुलभ व्हावे हा या अभ्यासाच्या परिणामांसह विषयाची आखणी करण्याचा हेतू आहे. ते म्हणाले की दिनदर्शिकेत दिलेले क्रियाकलाप अभ्यासाच्या परिणामांवर लक्ष केंद्रित करतात आणि अशा प्रकारे मुले त्यांच्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात पाठ्यपुस्तकांचा वापर करीत कोणत्याही स्रोतातून ते साध्य करू शकतात.
मंत्र्यांनी सांगितले की दिनदर्शिकेत कला शिक्षण, शारीरिक व्यायाम, योग इत्यादी अनुभवात्मक शिक्षण उपक्रमांचा समावेश आहे. या दिनदर्शिके मध्ये सारणी स्वरूपात वर्गनिहाय आणि विषयवार क्रियाकलाप आहेत. यात हिंदी इंग्रजी, उर्दू आणि संस्कृत अशा चार भाषांशी संबंधित क्रियाकलाप समाविष्ट आहेत. त्यांनी पुढे सांगितले की या दिनदर्शिकेत शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील ताणतणाव आणि चिंता कमी करण्याच्या धोरणांचा देखील समावेश करण्यात आला आहे. दिनदर्शिके मध्ये भारत सरकारच्या ई-पाठशाला, एनआरओईआर आणि दीक्षा पोर्टलवर उपलब्ध अध्यायनिहाय ई-सामग्रीच्या लिंकचा समावेश करण्यात आला आहे.
दिलेले सर्व क्रियाकलाप आदेशक नसून सूचक स्वरूपाचे आहेत तसेच कोणताही क्रम बंधनकारक नाही. शिक्षक आणि पालक उपक्रम संदर्भित करू शकतात आणि दिलेली क्रमवारी बंधनकारक न मानता विद्यार्थी ज्या गोष्टींमध्ये स्वारस्य दर्शवित असतील त्या प्रथम करू शकतात.
एनसीईआरटीने यापूर्वीच स्वयं प्रभा (किशोर मंच) दुरचित्र वाहिनी (विनामूल्य डीटीएच चॅनेल 128, डिश टीव्ही चॅनेल # 950, सन डायरेक्ट # 793, जिओ टीव्ही, टाटास्की # 756, एअरटेल चॅनेल # 440, व्हिडिओकॉन चॅनेल # 477), किशोर मंच अॅप ( प्ले स्टोअर वरून डाउनलोड केले जाऊ शकते) आणि YouTube लाइव (एनसीईआरटी अधिकृत चॅनेल) च्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसह थेट परस्परसंवादी सत्रे सुरू केली आहेत. ही सत्रे सोमवार ते शनिवार सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 या वेळेत प्राथमिक वर्ग, दुपारी 2:00 ते संध्याकाळी 4:00 दरम्यान उच्च प्राथमिक वर्ग आणि सकाळी 9:00 ते 11:00 पर्यंत माध्यमिक वर्गांसाठी प्रसारित केली जातात. या सत्रामध्ये दर्शकाशी संवाद साधण्याव्यतिरिक्त, विषयांच्या अध्यापनासह अनेक क्रियाकलाप देखील दर्शविले जातात. एससीईआरटी / एसआयई, शिक्षण संचालनालय, केंद्रीय विद्यालय संघटना, नवोदय विद्यालय समिती, सीबीएसई, राज्य शाळा शिक्षण मंडळे इत्यादींसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करून ही दिनदर्शिका प्रसारित केली जाईल.
हे आमच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि पालकांना कोविड-19 चा सामना करण्यासाठी घरी राहून ऑनलाईन शिक्षण संसाधने वापरण्यास सक्षम करेल आणि त्यांच्या शिक्षणाचा निकाल वाढविण्यासाठी सकारात्मक मार्ग शोधू शकेल.
कोविड-19 मुळे घरीच राहावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे पालक आणि शिक्षकांच्या मदतीने शैक्षणिक क्रीयाकलापांच्या माध्यमातून अर्थपूर्ण पद्धतीने गुंतवून ठेवण्यासाठी एमएचआरडीच्या मार्गदर्शनाखाली एनसीईआरटी ने प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका विकसित केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी प्राथमिक स्तरावरील (इयत्ता पहिली ते पाचवी) आणि उच्च प्राथमिक स्तरावरील (इयत्ता सहावी ते आठवी) पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका एप्रिल 2020 मध्ये प्रसिद्ध केली होती.