मुंबई : कोरोना योद्ध्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या सन्मानार्थ देशातील सैन्य दलाने उद्या, 3 मे 2020 रोजी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ही घोषणा संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल केली. याचाच एक भाग म्हणून नौदलाचे पश्चिम मुख्यालय, भारतीय नौदल जमिनीवर, हवेत आणि पाण्यावर विविध प्रात्यक्षिके करण्याचे नियोजन करीत आहे. त्यासाठी नियोजनाप्रमाणे आज तालिम सुरू आहे.
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे सायंकाळी 19:30 ते 23:59 वाजेपर्यंत या काळात नौदलाच्या साधारण 15 जहाजांवर रोषणाई केली जाणार आहे. `इंडिया सॅल्युट्स करोना वॉरियर्स` असा मजकूर लिहिलेले फलक झळकविले जाणार आहेत, जहाजांवर भोंगा वाजविला जाईल आणि 19:30 वाजता रोषणाई केली जाईल.
कोविड 19 चे रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयांवर भारतीय नौदलाची विमान वाहतूक सेवा पुष्पवृष्टी करणार आहेत. कस्तुरबा गांधी रुग्णालय आणि आयएनएचएस अश्विनी, मुंबईत कुलाबा आणि जीएमसी आणि गोव्यातील ईएसआय रुग्णालय यांची यासाठी निवड झाली आहे. हा उपक्रम रात्री 10:00 ते 10:30 दरम्यान घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
याशिवाय, गोवा येथे नौदलाच्या हवाई केंद्राच्या धावपट्टीवर मानवी साखळीच्या माध्यमातून करोना योद्धांचा सन्मान करणारा संदेश देण्यात येणार आहे. प्रत्येक उपक्रमाचे हवाई छायाचित्रीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमांदरम्यान सामाजिक सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचे निश्चितच पालन केले जाणार आहे. उद्या ज्या वेळेत कार्यक्रम होणार आहेत, त्याच वेळेत आज सरावाचे नियोजन करण्यात आले आहे.