नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज दिवसभरात २८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशभरातल्या कोरोनाबाधितांची संध्या ४० हजार २६३ झाली आहे. दरम्यान रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २६ टक्क्यांहून अधिक असून, आत्तापर्यंत १० हजार ८८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या आजारानं आत्तापर्यंत १ हजार ३०६ जण दगावले असून, सध्या २८ हजार ७० जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

राज्यात काल 790 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून रुग्णांचा आकडा 12 हजार 296 वर पोचला आहे. राज्यात काल छत्तीस रुग्ण दगावले यात मुंबईतल्या सत्तावीस रुग्णांचा समावेश आहे. याबरोबरच राज्यातल्या मृतांचा आकडा 521 वर पोचला आहे, मात्र काल राज्यातले 121 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यातले दोन हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत 597 नवीन रुग्णांची भर पडली. याबरोबरच मुंबईतल्या रुग्णांचा आकडा 8 हजार 359 झाला आहे.

औरंगाबादमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे २५ नवे रुग्ण आढळून आले. सकाळी १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर सायंकाळी आणखी ८ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याची माहिती शासकीय रुग्णालय घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. औरंगाबाद इथं आता कोरोनाबाधित एकूण रूग्णांची संख्या दोनशे एक्क्याऐंशी झाली आहे.

दरम्यान, घाटी रुग्णालयात आज एका २८ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेची प्रसूती झाली. तिनं एका मुलीला जन्म दिला. दोघींची प्रकृती स्थिर असल्याचं स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितलं.

गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ कोरोनाचा एकही रुग्ण नसणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातल्या बंगाली कॅम्प परिसरात असणाऱ्या क्रिष्णा नगर भाग सील केला आहे. या रुग्णाला आणि त्याच्या  कुटुंबातल्या सदस्यांना निरीक्षणाखाली ठेवलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांनी घाबरून न जाता अधिक जबाबदारीनं वागावं, असं आवाहन केलं आहे.

धुळे शहरात कोरोना आज तीन  रूग्ण पॉझिटिव आढळल्यामुळे शहरातली रूग्ण संख्या 23 झाली असून साक्रीतील चार, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्या तले प्रत्येकी दोन रूग्णांमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 31 वर पोहोचला आहे.

अमरावती शहरात आज दोन रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले असून रुग्णांची एकूण संख्या 55 झाली आहे. आतापर्यंत दहा रुग्णांचा मृत्यू झाला असून 39 रुग्ण उपचार घेत आहेत आणि चार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अजून 388 अहवाल प्रलंबित आहेत.

सिंधुदुर्गात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या सान्निध्यात आलेल्या सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. सावंतवाडी इथं गरोदर महिलेला सोडण्यासाठी आलेली व्यक्ती कोल्हापूर इथं  कोरोना बाधीत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४६२ व्यक्तींना विलग केलं असून  त्यापैकी ३२० व्यक्तींना घरीच विलग करण्यात आलं आहे. तर १४२ व्यक्ती या संस्थात्मक विलगीकरणात आहेत.