नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नामुळे, भारत आत्तापर्यंत कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यशस्वी ठरला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. आजवर देशात देवी आणि पोलिओ सोडून इतर कोणताही साथीचा आजार समूळ नष्ट झालेला नाही. ते परत येत राहतात असं सांगत त्यांनी कोरोनाचा दीर्घकाळ अस्तित्वात राहण्याची शक्यता व्यक्त केली.

मात्र त्याचवेळी या आजारामुळे लोकांच्या आरोग्य आणि स्वच्छताविषयक सवयी बदलु लागल्या आहेत, त्या अशाच कायम राहिल्या तर, या आजाराचा जोर ओसरल्यानंतर आरोग्यदायी समाज पाहायला मिळेल असा विश्वासही हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. अर्थव्यवस्थेसोबतच लोकांचं आरोग्यही महत्वाचं असल्यानंच सध्याच्या संचारबंदीला १७ मे पर्यंत मुदतवाढ दिल्याचं ते म्हणाले.

दरम्यान देशात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची गती स्थिर असली तरी, वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय असल्याचं मत दिल्लीतल्या एम्सचे संचालक रणदीप गुलेरीया यांनी व्यक्त केलं आहे. अनेक तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार भारत मे महिन्याच्या अखेरीस किंवा जुनच्या मध्यात रुग्णांच्या संख्येच्या सर्वोच्च टप्प्यापर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली. ही बाब लक्षात घेऊन आपण अधिक सतर्क राहत रुग्ण संख्या कमी व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.