नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुध्दच्या लढ्यात भारत पुर्ण तयारीने उतरला आहे, आणि इतर देशांना देखील मदत करत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बुध्द पौर्णिमे निमित्त आय़ोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. मदतीसाठी भारत कोणाबरोबरंही आणि कसलाही भेदभाव करणार नाही.
बुध्द म्हणजे सत्याचं प्रतिक आहे. त्यामुळेच भारत हे सत्य ओळखून मानवता आणि जगाच्या कल्याणासाठी इतर देशांना मदत करत आहे. बुध्दांची प्रत्येक शिकवणूक मानवाच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा देते. बुध्द म्हणजे समर्पण भाव आण सेवा, असंही मोदी म्हणाले.
अहिंसा, शांती आणि मानव सेवा या भगवान बुद्धांनी दिलेल्या शिकवणीमुळे भारतीयांचं सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनमान उंचावलं आहे, आणि अनेक पिढ्या समृद्ध झाल्या आहेत, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही शिकवण दीपस्तंभाच काम करत आहे, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीच्या अनुसरणातून आपण संकटावर मात करण्याची प्रेरणा घेऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला आहे. त्यांच्या संबोधी – ज्ञानाची आज जगाला नितांत गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.