नवी दिल्ली : जालना जिल्ह्यातून भुसावळकडे पायी निघालेल्या स्थलांतरित १६ कामगारांचा आज मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्याच्या करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सटाणा शिवार इथं ही दुर्घटना झाली. परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते.

रेल्वे रुळांच्या वाटेने ते पायी निघाले होते. थकून रुळांवरच झोपले असताना जालन्याहून आलेल्या मालगाडीखाली ते चिरडले गेले. त्यांच्यासोबतचे २ जण गंभीररीत्या जखमी झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत.

स्थलांतरित कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

परराज्यातील सर्व मजुरांची अन्न, निवारा आणि औषधाची व्यवस्था संबंधित ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे, ती अगदी  शेवटचा मजूर घरी जाईस्तोवर चालू राहील, त्यामुळे निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पडू नये,रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी व्यवस्थित माहिती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांना दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आपण या संदर्भात रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली असून सर्व ती मदत करु असं त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.