नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरंन्सींगद्वारे भारतीय चिकित्सक संघटनेच्या डॉक्टरांबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. covid-19 विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी सरकार घेईल असं आश्वासन शहा यांनी या बैठकीत दिलं. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन हे देखील या बैठकीत उपस्थित होते.

देशातील कोरोना विषाणूच्या प्रसाराची स्थिती पाहता डॉक्टरांनी लाक्षणिक संप सुद्धा टाळावा असे आवाहन शहा यांनी यावेळी केले . सरकारनं आणि गृहमंत्रालयानं तातडीनं डॉक्टरांच्या प्रश्नां कडे लक्ष दिल्यामुळे भारतीय चिकित्सक मंडळानं आपला लाक्षणिक निदर्शनंचा निर्णय रद्द केला आहे.

covid-19 विरोधी लढ्यात डॉक्टर घेत असलेल्या परिश्रमाची शहा यांनी प्रशंसा केली. डॉक्टर्स करत असलेल्या त्यागामुळे देश covid-19 आजारापासून मुक्त होईल असंही शहा म्हणाले. मागच्या काही दिवसात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याची शहा यांनी निंदा केली. प्रधानमंत्री याबाबतीत जातीनं लक्ष देत असल्याची माहिती शहा यांनी दिली. या बैठकीनंतर आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी  वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत सरकारने दिलेले दिशानिर्देश काटेकोरपणे पाळण्याची सूचना  राज्य सरकारांना दिली आहे. यामध्ये कोरोना बाधितांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हायड्रॉक्साइड क्लोरोक्वीन देणे,  त्यांना PPE आणि N-९५मास्क पुरवणे, कुठल्याही संरक्षणाशिवाय कोरोना बाधितांची तपासणी करणाऱ्याची टेस्ट करणं या सारख्या निर्देशांचा समावेश आहे.