नवी दिल्ली : कैलास-मानसरोवर यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या  धार्चुला ते लीपुलेख(चीन सीमा) या मार्गाचे काम पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी BRO म्हणजेच, सीमा रस्ते संघटनेचे कौतुक केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज या रस्त्याचे उद्घाटन झाले. सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवून पिथोरागढ येथून वाहनांचा पहिला ताफा रवाना केला.

या रस्त्यामुळे पहिल्यांदाच सीमेवरची गावे एकमेकांशी जोडली गेली असून कैलास मानसरोवर यात्रेसाठीचा 90 किलोमीटरचा अवघड ट्रेक टाळून या रस्त्याने थेट चीनच्या सीमेपर्यंत वाहनाने जाणे शक्य होणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

धार्चुला- लीपुलेख मार्ग, पिथोरागढ-तवाघाट-घाटियाबागढ मार्गाचाच पुढचा टप्पा आहे. तो टियाबागढ इथे सुरु होऊन लीपुलेख खिंडीत म्हणजेच कैलास मानसरोवराच्या प्रवेशद्वाराशी संपतो. या 80 किलोमीटर लांब मार्गाची उंची 6000 ते 17,060 फूट इतकी आहे. या मार्गामुळे आता भाविकांना या उंच पर्वतामधून करावा लागणारा अवघड ट्रेक टाळून थेट वाहनाने जाता येईल, ज्यामुळे या यात्रेचा कालावधी देखील कमी होऊ शकेल.

सध्या कैलास मानसरोवर यात्रेला सिक्कीम किंवा नेपाळमार्गे सुमारे दोन ते तीन आठवडे लागतात. तसेच वयस्कर यात्रेकरूंना या मार्गाने जाणे अत्यंत कठीण असते, त्यामुळे त्यांचीही आता सोय होऊ शकेल.

या रस्त्याच्या बांधकामात अनेक अडथळे आले आहे. सततची बर्फवृष्टी, किमान तापमान आणि अत्यंत उंचीवर असल्यामुळे बांधकामात बंधने येत असत. कैलास मानसरोवर यात्रा जून ते ऑक्टोबर या काळात असते. याचा काळात इथली स्थानिक व्यापारी वाहतूकही होत असते, त्यामुळेही या बांधकामात व्यत्यय येत असे. या कामात BRO च्या अनेक कर्मचाऱ्यांचा बळी गेला आणि अनेक साधनांचेही नुकसान झाले.

मात्र, या सर्व अडथळ्यांवर  सीमा रस्ते संघटनेने BRO मात करुन आपल्या कामांची गती वाढवून हे काम पूर्ण केले.