मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या लातूर, परभणी, नांदेड, पुणे, सोलापूर, यवतमाळ, अहमदनगर, बीड आणि रायगड या जिल्ह्यांमधल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला असल्याचा दुजोरा मिळाला आहे. मध्यप्रदेशातील छतरपूर तसेच गुजरातमधील सुरत, नवसारी, नर्मदा, उत्तराखंडमधील डेहराडून आणि उत्तर प्रदेशच्या कानपूर या जिल्ह्यांमध्येही बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव झाला असल्याचं केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाने म्हटले आहे.

या व्यतिरिक्त दिल्लीत नजाफगड येथे कबूतरे, घुबड आणि रोहिणी भागात पाण बगळ्यांची बर्ड फ्लूची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचीही माहिती देण्यात आली. देशातल्या बर्ड फ्लू संसर्गावर देखरेख ठेवण्यासाठी नेमण्यात आलेलं केंद्रीय पथक बाधित भागांना भेट देऊन तिथल्या स्थितीचा बारकाईनं अभ्यास करणार असल्याचंही पशुसंवर्धन खात्याच्या वतीनं सांगण्यात आलं.

चिकन, अंडी यासारख्या गोष्टींच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा राज्यांनी फेरविचार करून बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नसलेल्या राज्यातल्या तसंच राज्याबाहेरच्या इतर भागातून आणलेल्या अंडी, चिकनच्या विक्रीला परवानगी द्यावी, असंही या खात्यानं सांगितलं असून योग्य प्रकारे शिजवलेलं चिकन किंवा अंडी खाणं माणसांना अपायकारक नसल्याचंही पुन्हा सांगण्यात आलं आहे.