नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दिडशेव्या वर्षानिमित्त आयोजित समारंभाचं उद्धाटन होणार आहे. कोलकाता पोर्ट टस्टच्या सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात होईल.
भारताला वारसा पर्यटनासाठी बाजारपेठ उपलब्ध करावी, असं आवाहन मोदी यांनी काल केलं. भारत हे वारसा पर्यटनाचं महत्त्वाचं केंद्र बनावं, असं मोदी यांनी ऐतिहासिक करन्सी बिल्डींग इथं एका मूर्तीचं अनावरण केल्यानंतर सांगितलं. केंद्रसरकार भारतीय वारसा संस्थेच्या स्थापनेला कोलकात्याच्या भारतीय संग्रहालयापासून सुरुवात करणार आहे.
ऐतिहासिक करन्सी बिल्डींगसह चार वास्तूंचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं. देशातल्या पाच संग्रहालयांचं आधुनिकीकरण, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करायचं सरकारनं ठरवलं आहे, असं ते म्हणाले. बंगालला उच्च संस्कृती आणि वारसा लाभलेला आहे आणि या संस्कृतीनं आपल्याला एकत्र बांधलं आहे, असं मोदी यांनी सांगितलं.
येत्या २०२२ मध्ये भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असताना ईश्वरचंद्र विद्यासागर यांची दोनशेवी जयंतीही आपण साजरी करणार आहोत, असं ते म्हणाले. यावेळी महान समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांची अडीचशेवी जयंतीसुद्धा देश साजरा करणार आहे, अशी माहिती प्रधानमंत्री मोदी यांनी दिली.